पाण्याचे वाढते महत्त्व लक्षात घेता बोरिवली पश्चिमेकडील आय.सी. कॉलनी येथे शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या पुढाकाराने आता प्रत्येक गृहनिर्माण संस्थेत रेन हार्वेस्टिंग प्रकल्प राबविण्यात येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त, शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली आय.सी.कॉलनीतील 4 गृहनिर्माण संस्थांमध्ये आज माझी वसुंधरा मोहिमेअंतर्गत रेन हार्वेस्टिंग प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. माझी वसुंधरा अभियानाचे सुभाजीत मुखर्जी यांच्या हस्ते आज बोरिवली पश्चिम आय. सी. कॉलनीतील सलढाना, एक्झॉटिक सोसायटीत या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. आज गृहनिर्माण संस्था मध्ये देखील मोठ्या प्रमाणावर काँक्रीटीकरण झाल्याने पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नाही. त्यामुळे रेन हार्वेस्टिंग प्रकल्प राबविणे गरजेचे असल्याचे मत सुभाजीत मुखर्जी यांनी यावेळी व्यक्त केले. दरम्यान आगामी काळात पाण्याचे महत्त्व लक्षात घेता त्याची नासाडी टाळणे गरजेचे आहे. पावसाळ्यात लाखो लिटर पाणी वाया जाते, हे लक्षात घेता आपल्या प्रभागातील प्रत्येक गृहनिर्माण संस्थांमध्ये रेन हार्वेस्टिंग प्रकल्प राबवण्याचा निर्धार शिवसेना प्रभाग क्रमांक 1 च्या नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी व्यक्त केला.त्यानुसार आता प्रभागातील प्रत्येक गृहनिर्माण संस्थेत हा प्रकल्प मोफत राबविला जाणार आहे. यावेळी माजी नगरसेवक, मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर, पंचमहाभूते फाउंडेशनचे अध्यक्ष अमित सावंत, उपविभाग प्रमुख भालचंद्र म्हात्रे, उपविभाग संघटक शकुंतला शेलार, शाखा प्रमुख राजेंद्र इंदुलकर, महिला शाखा संघटक ज्यूडीथ मेंडोसा, युवा सेनेचे जितेन परमार,दर्शित कोरगावकर सहित कार्यकर्ते उपस्थित होते.