रिपोर्ट- जनक दवे
मुंबई:- कोणताही परवाना नसताना मूडी अप्लिकेशनद्वारे सुरु असलेल्या बेकायदेशीर ट्रेंडिंगचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी फरार असलेल्या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. धिमंत केतन गांधी असे आरोपीचे नाव आहे. स्टॉक एक्सचेंजच्या अधिकाऱ्यासह दोन पंचांसमक्ष छापा टाकला. त्यानंतर गुन्हा दाखल करत अटकेची कारवाई करण्यात आली. कांदिवली पश्चिमेतील महावीर नगर येथे हे बेकायदेशीर ट्रेंडिंग सुरु होते. याप्रकरणी याआधी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी फरार होता. त्याला अटक करण्यात आली आहे.
गुन्हे शाखा कक्ष 11 चे मुंबई कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण यांना कांदिवलीत महावीर नगरमध्ये बेकायदेशीर ट्रेंडिंग सुरु असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी 20 जून रोजी स्टॉक एक्सचेंज अधिकाऱ्यासह दोन पंचांसमक्ष सदर ठिकाणी छापा टाकला. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. चार आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र मुख्य आरोपी फरार होता. त्याचा शोध सुरु होता. गुन्हे शाखा 11 चे पोलीस निरीक्षक घोणे यांना फरार आरोपीबाबत गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली आहे.
मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहआयुक्त लखमी गौतम, अप्पर पोलीस आयुक्त शशी कुमार मीना, पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण या निर्देशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव, सहाय्यक फौजदार कांबळे, पोलीस हवालदार कदम, पोलीस हवालदार सावंत यांनी ही कामगिरी केली.